जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. आठवडाभरापासून तापमान ४० अंशांपुढे असून वाढत्या उकाड्यापासून जळगावकर हैराण झाले आहे. यातच आता आजपासून चार दिवस सूर्य आग ओकणार असून उष्णतेची लाट येणार आहे. अर्थात, ७ मे पर्यंत तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
गुजरात राज्यातील उष्ण बारे सक्रीय झाल्याने गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. आठवडाभरापासून तापमान ४० अंशांपुढे असून काल शुक्रवारी सुद्धा तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकण्यास सुरूवात केली होती. परंतु, अधून-मधून तापमानात चढ-उतार बघायला मिळाले.
मे महिना हा सर्वाधिक उष्ण महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून तापमान ४१ अंशांवर गेले आहे. ४, ५, ६ आणि ७ तारखेला हवामान कोरडे राहणार असून या चारही दिवस सूर्य आग ओकेल. गुजरात येथील उष्ण वारे जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. परिणामी या चार दिवसात तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.