जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२५ । जळगाव राज्यात किमान तापमानात चढ उतार कायम असून १२ अंशावर गेलेला जळगावचा रात्रीचा पारा पुन्हा घसरून १० अशांवर आला आहे. यामुळे थंडी पुन्हा वाढू लागली आहे. तर उद्यापासून राज्यात किमान तापमानाचा पारा घसरून थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात वर्षाअखेरीस गुलाबी थंडी पाहायला मिळते आहे. आज २०२५ मधला शेवटचा दिवस असून उद्या पासून इंग्रजी नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. कित्येक दिवसांपासून कमी झालेला गारठा नव्या वर्षाच्या स्वागताला पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळाले.

किमान तापमानाचा पारा १२ अंशावर गेल्यानं थंडी काहीशी कमी झाली. मात्र आता जळगावच्या तापमानात पुन्हा घसरण दिसून आले. सोमवारी १२.४ अंशावर असलेले किमान तापमान मंगळवारी घसरून १० अंशावर पोहोचले आहे. याचसोबतच रात्री आणि सकाळच्या वेळेतील थंडीच्या कडाक्याच्या आणखी वाढ झाली आहे.

उत्तरेकडील भागात बर्फवृष्टीसह धुक्याचे प्रमाण वाढलेले असून त्यामुळे जळगाव शहरसह जिल्ह्यात ३१ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका राहू शकतो. किमान तापमान ९ ते १२ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान २७ ते ३० डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. १ जानेवारी रोजी सकाळचे किमान तापमान हे ९ ते ११ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. १ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होईल व थंडी जाणवेल, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.







