जळगावकरांनो..! घामाच्या धारा सहन करा, पुढील चार पाच दिवस पाऊस सुट्टीवर

जुलै 17, 2025 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२५ । जळगावसह राज्यातील बहुतांश ठिकाणी सध्या पावसाने ब्रेक घेतला आहे. आज (१७ जुलै) विदर्भ वगळता कुठेही पावसाचा अलर्ट दिला नाही. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आज १७ ते २१ जुलैदरम्यान पावसाला ब्रेक लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत तापमानासह उकाड्यात वाढ होणार आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात जळगावकर घामाच्या धारांनी हैराण होणार.

weather changing jpg webp

जुलै महिन्यात तब्बल ३८ टक्के पावसाची तूट

यंदा पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम आहे, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांचीही चिंता वाढली आहे. जून महिन्यात जिल्ह्याने सरासरी गाठत १२४ मिमी पावसाची नोंद केली असली, तरी जुलै महिन्याची आकडेवारी मात्र चिंताजनक आहे. काल १६ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ६० मिमी पाऊस झाला आहे, जो या कालावधीतील सरासरी ९७ मिमीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के आहे. याचा अर्थ जुलै महिन्यात तब्बल ३८ टक्के पावसाची तूट दिसून येत आहे. मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर मुख्य पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार

जळगावात आजपासून पुढील चार पाच दिवस पाऊस ब्रेक घेणार आहे. या कालावधीत तापमानासह उकाड्यात वाढ होऊन काही ठिकाणी विशेषतः दुपारनंतर तुरळक ते हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. काहीसे वातावरण ढगाळ राहणार असून कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now