जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२६ । मागील काही दिवसांपासून जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून यामुळे जळगावकर अक्षरश: होरपळून निघत आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) मोसमातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, ही केवळ सुरुवात असून, आगामी ४८ तास जळगावकरांसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहेत. हवामान विभागाने उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट :
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज १७ आणि उद्या १८ एप्रिल रोजी तापमान ४४ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे जळगावकरांसाठी आगामी दोन दिवस महत्वाचे असणार आहे. मात्र, या तडाख्यानंतर लगेचच जिल्ह्यात अवकाळी पावसाची एन्ट्री होणार आहे.

अवकाळी पावसाचा इशारा :
९ एप्रिलपासून जिल्ह्यात ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जळगावकरांना काही दिवसांतच तीव्र उष्णता आणि वादळी पावसाचा दुहेरी सामना करावा लागणार आहे.
२० ते २३ एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरणासह अधूनमधून वादळी पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे तापमानात तात्पुरती घट होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, हा दिलासा फार काळ टिकणार नसून २५ एप्रिलपासून पुन्हा एकदा उष्णतेची लाट जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कोरड्या हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे खान्देशात तापमानाचा पारा वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे ‘उष्माघाताचा’ धोका वाढला आहे.
वाचा आगामी पाच दिवसाचा हवामान अंदाज?
दिनांक… तापमान…. आणि वातावरणाची स्थिती
१७ एप्रिल : ४४ अंश…..उष्णतेची लाट (यलो अलर्ट)
१८ एप्रिल : ४४ अंश….. उष्णतेची लाट (यलो अलर्ट)
१९ एप्रिल : ४१ अंश….. दुपारनंतर ४० ते ५० किमी वादळीवाऱ्यांसह पाऊस (यलो अलर्ट)
२० एप्रिल : ३९ अंश….. ढगाळ वातावरण, दुपारनंतर वादळी पाऊस
२१ एप्रिल : ३९ अंश….. ढगाळ वातावरण, दुपारनंतर वादळी पाऊस







