जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२५ । मागच्या काही दिवसापासून जळगावसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आता नोव्हेंबर महिन्यात धो धो पावसाचा अंदाज आहे. आज १ नोव्हेंबर रोजी पहाटपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्यानं राज्यात येत्या ५ नोव्हेंबर पर्यंत पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे आगामी काही दिवस अवकाळीचे ढग कायम राहणार आहे. आज जळगावसह काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे

आज या जिल्ह्यांना इशारा
हवामान विभागाच्या मते, आज मुंबई आणि उपनगरासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन पावसाचा लपंडाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जळगावात आगामी काही दिवस अवकाळीचे ढग कायम
सध्या अरबी समुद्रात सध्या डीप डिप्रेशन (वायू दाब) निर्माण झाल्यामुळे ढगांचे घन संचय होत आहे, जे ओलाव्यासह गुजरात आणि महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यात १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान संमिश्र हवामान असेल. ऊन, ढगाळ वातावरण व काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज शनिवारी सकाळपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला असून कापूस, सोयाबीन, मक्यासह इतर पिकांचे मोठं नुकसान झाले.
दरम्यान अवकाळी पावसामुळे थंडीचे आगमनही लांबले आहे. ५ नोव्हेंबरनंतर जिल्ह्यात पावसाचं वातावरण निवळणार असून थंडी पडण्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.






