जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा थंडीचा कडाका आता ओसरत असून हळूहळू तापमानात वाढ होत असल्याने दिवसा उन्हाचा चटका बसू लागला आहे. रविवारी जळगावचे रात्रीचे तापमान १३.२ अंश तर दिवसाचे तापमान ३२.५ अंशावर गेला. दरम्यान, महाशिरात्रीला पारा ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात जळगावचा दिवसाचा पारा ३२ अंशावर पोहोचला आहे.सध्या जळगावकरांना दुहेरी वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे. दिवसा उन्हाचा चटका बसत आहे. तर रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा बदलल्यानंतर काहीशी थंडी जाणवत आहे. हिवाळा अजून संपला नसला तरी उन्हाळ्याच्या दिशेने वाटचालीला लवकर सुरुवात होण्याची शक्यता आहे . कारण फेब्रुवारी अखेरनंतर रात्रीच्या तापमानासोबतच तापमानातही वाढ होत जाणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

जळगावचे आजचे तापमान
दरम्यान आज दिनांक ९ फेब्रुवारीपासून हवामान मुख्यतः स्वच्छ आणि कोरडे राहील. दिवसा कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांपर्यंत गेल्याने दुपारी उष्मा जाणवणार आहे. महाशिरात्रीला पारा ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पुढील सहा दिवस पावसाची शक्यता नाही. दिवसा सूर्याच्या किरणांची तीव्रता वाढल्याने आणि दिवस लांब झाल्याने दुपार आणि संध्याकाळच्या वेळी उन्हाचे चटके जाणवतील. मात्र, रात्री जमिनीजवळ थंड हवा स्थिर राहत असल्याने किमान तापमान १४ ते १६ अंशांच्या दरम्यान राहील. यामुळे सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. १४ आणि १५ फेब्रुवारीपासून तापमानात आणखी मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. यामुळे उकाडा वाढणार असून कोपऱ्यात पडलेले कुलर दुरुस्तीसाठी जळगावकरांकडून काढले जात आहेत.






