जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे थंडीचा कडाका गायब झाला आहे. उत्तरेकडे सध्या प्रचंड थंडी असली तरी राज्यात म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात शीतलहरी येत नसल्याने गारठा कमी झाला. दरम्यान, आज जळगावसह राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला जाणवणारा कडाक्याचा थंडीचा तडाखा आता काहीसा कमी झाला असला, तरी बुधवार, २१ जानेवारी रोजी जळगावात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सकाळपासूनच दाट धुके आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे दिवसा देखील काही प्रमाणात गारवा जाणवत होता.

दरम्यान, आगामी काही दिवस जळगाव शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहू शकते. इतकेच नव्हे तर जिल्ह्याच्या काही भागात किरकोळ पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यताही वर्तवण्यात हवामान खात्यानं वर्तविली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे ढगाळ वातावरणामुळे रोखले गेल्याने, रात्रीच्या किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
आगामी पाच दिवस वातावरणाची स्थिती
दिनांक, रात्रीचे तापमान आणि वातावरणाची स्थिती
२२ जानेवारी : १३ अंश, सकाळी धुके, दुपारपर्यंत काही अंशी ढगाळ वातावरण
२३ जानेवारी : १४ अंश, ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
२४ जानेवारी : ११ अंश, कोरडे वातावरण
२५ जानेवारी : १२ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण
२६ जानेवारी : १३ अंश, ढगाळ वातावरण







