जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरु असल्याने तापमानात घट झाली होती. वातावरणातही गारवा होता. मात्र आता पावसाने पाठ फिरवल्याने तापमानाचा पारा वाढू लागला आहे. जळगावात आगामी आठवडाभर तापमानाचा पारा २ ते ३ अंश सेल्सियसने वाढणार आहे. एकीकडे वातावरणातील दमटपणात वाढ झाली असताना तापमानात वाढ होणार असल्याचे आगामी पाच दिवस जळगावकरांना घाम फोडणार आहे. दरम्यान आज रविवारी सायंकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जळगावात मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरु असलयाने तापमानात मोठी घसरण झाली होती. जळगावातील तापमानाचा पारा ३० अंशाखाली घसरला होता. मात्र मागच्या तीन ते चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण असतानाही वातावरणातील दमटपणा वाढला आहे. तशातच रविवारपासून तापमानाचा पारा ३० अंशावर जाऊ शकतो.

सोमवार आणि मंगळवारी हा पारा एका अंशाने खाली येण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. त्यासोबतच किमान तापमानाचा पारा २३ अंशावर असणार आहे. मंगळवारपासून मात्र किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दि.१५ पासून तापमानाचा पारा ३० अंश सेल्सियसवर जाईल. १६ ते १८ जुलैदरम्यान तापमानाचा पारा ३१ अंशावर राहणार आहे. तर किमान पारा २४ अंशावर जाणार आहे. १६ जुलै रोजी ३१ अंशावर पारा जाण्याचा अंदाज व्यक्त झाला असतानाच जोरदार पावसाची मात्र शक्यता नाही. त्यामुळे वातावरणातील आर्द्रतेत वाढ होणार आहे. साहजिकच जळगावकरांना असह्य उकाड्याला सामोरे जावे लागणार आहे.







