जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२४ । गेल्या काही दिवसापासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावात तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला होता. मात्र शनिवारी एकाच दिवसात किमान आणि कमाल तापमानाचा पारा वाढला. यामुळे दुपारी उन्हाचा चटका बसत होता.
या आठवड्याच्या सुरुवातीला तापमानाचा पारा ८ अंशावर आल्याने हुडहुडी भरणारी थंडी जळगावकरांना जाणवत आहे. जळगावचे किमान तापमान ८.४ अंशापर्यंत होते. तर कमाल तापमान २९ अंशापर्यंत आले होते. शुक्रवारी किमान तापमान ९.३ अंशावर होते, मात्र शनिवारी यात वाढ होऊन किमान तापमान १२ अंशावर पोहोचले. कमाल तापमानही ३० अंशावर पोहोचले.
राज्यातील या भागात पुढचे तीन दिवस असे राहणार?
सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीसमोर, दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार समुद्री क्षेत्रात, समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत, अरबी समुद्रात, असलेल्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून, दक्षिणी(दक्षिणेकडून उत्तरेकडे) वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण कोकण, खान्देश व नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व छ.सं.नगर, जालना अशा एकूण १९ जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता लोटली जात आहे. त्यामुळे ह्या १९ जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यन्त सकाळच्या वेळेस धुके पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
तर संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित सहा असे एकूण १७ जिल्ह्यात मात्र उत्तरी( उत्तरेकडून दक्षिणेकडे) वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे तेथे मात्र माफक थंडी जाणवणारच आहे, असे वाटते. कांदा, गहू, हरबरा पिकावर अळी, किडी, बुरशी, माव्याचे आक्रमण होवु शकते. तर किड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागण्याचीही शक्यता आहे.