जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२४ । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाल्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. मात्र यातच तामिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालाय. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यात देखील ३ ते ५ डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज असून यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.
फंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री साडेसात वाजता तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. त्यामुळे पदुचेरी आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस कोसळला. या चक्रीवादळामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.त्याशिवाय महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज वर्तवलाय. चक्रीवादळामुळे तापमान वाढून थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज?
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानात घट झाल्याने थंडी जाणवत होती. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नीचांकी तापमान १२.५ अंशांवर होते. यंदा २९ नोव्हेंबर रोजी तापमान १० अंशांवर गेल्याने गारठा वाढला होता. दरम्यान सन २०२३मध्ये नोव्हेंबर महिन्यात ६१.१२ मिलिमीटर पाऊसही झाला होता. यंदा मात्र संपूर्ण महिन्यात एकही दिवस पाऊस पडलेला नाही. आता १ व २ डिसेंबर रोजी तापमानात काही अंशी वाढ होईल. त्यानंतर ३ ते ५ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही तालुक्यांत तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या काळात कमाल तापमान ३३ तर किमान तापमान १४ ते १६ अंशांवर जाणार आहे. शनिवारी किमान तापमान ११.९ अंशांवर होते. दरम्यान, पुढे १५ डिसेंबरपर्यंत तापमानात जास्त घट होणार नाही. त्यानंतर पुन्हा कडाक्याच्या थंडी पडेल असे हवामान अभ्यासक यांनी सांगितले.