⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगाव विधानसभेसाठी इच्छुक म्हणजे ‘उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी सर्वांची तयारी म्हणजे ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशीच म्हणावी लागेल. महायुती आणि महाआघाडीचे अद्याप काही ठरलेले नसताना इच्छुकांकडून तयारी करणे हे केवळ हवेत तीर मारण्यासारखे आहे.

जळगाव शहर मनपामध्ये भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या एक वर्षातील कायापालटच्या आश्वासनावर विश्वास ठेवत एक हाती सत्ता मिळवली होती. भाजप सत्तेत आल्यानंतर नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. भाजपने आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा निधी पदरात पाडून घेतला तरी केवळ नियोजन नसल्याने त्या पैशांचा योग्य पद्धतीने विनियोग होऊ शकला नाही.

भाजपतील अंतर्गत गटबाजीचा फायदा सेनेने उचलला आणि २७ नगरसेवक आपल्या गळाला लावले. भाजपचे नगरसेवक फोडताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चासमोर येत असल्या तरी शहराच्या विकासासाठी आम्ही पक्ष बदल केल्याची प्रतिक्रिया बंडखोर नगरसेवकांनी दिली. 

शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित करताच अनेक चेहरे आमदारकीची तयारी करू लागले. विद्यमान महापौर जयश्री महाजन, विरोधीपक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गटनेते ललित कोल्हे यांच्या नावाची चर्चा असतानाच ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे नाव समोर आले. विधानसभा निवडणूक लढविण्या संदर्भात सेनेचा एकही नेता अधिकृत माहिती देत नसला तरी अंतर्गत दृष्ट्या प्रत्येकाने तयारी आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 

शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी होत असतानाच राष्ट्रवादीकडून गेल्या वेळेस निवडणूक लढविलेले महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार मनिष जैन, अशोक लाडवंजारी, सुनील खडके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे  काँग्रेसकडून अद्याप कोणताही मोठा चेहरा समोर येत नसला तरी गेल्या काही पंचवार्षिकमध्ये निवडणूक लढविलेले काही चेहरे किंवा एखादा नवीन चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे हे दोघेच सध्या प्रबळ दावेदार आहेत. कैलास सोनवणे यांना घरकुलप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असल्याने त्यांच्या ऐवजी माजी महापौर भारती सोनवणे या निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप-शिवसेना राष्ट्रवादीकडून इच्छुकांची भाऊगर्दी होत असली तरी अद्याप सर्वांचं भवितव्य अधांतरीच आहे. राज्यस्तरावर महायुती किंवा महाआघाडी याबाबत काय होणार? येत्या काही महिन्यात किंवा पुढील वर्षी सत्तांतर होणार का? असे अनेक प्रश्नचिन्ह समोर आहेत. पुढील राज्यस्तरावर होणाऱ्या पक्षांच्या निर्णयासह ऐनवेळी पक्षांतर करून किंवा पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ सदस्याने जळगाव विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. 

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात कार्यालय उघडणे, सेवा कक्ष स्थापन करणे, सोशल मीडिया प्रमोशन करणे, मान्यवरांच्या भेटी-गाठी घेणे, दबावतंत्राचा अवलंब करणे अशा कितीतरी संपर्कबाबींचा उपयोग करणाऱ्या इच्छुकांचा ऐनवेळी हिरमोड होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यापूर्वीच तयारीला लागत प्रयत्न केल्यास त्यांना त्यात नक्की यश मिळू शकते हे मात्र निश्चित आहे