विद्यापीठातील वित्त लेखाधिकारी गोहीलांच्या राजीनाम्याने खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वित्तलेखा अधिकारी एस.आर.गोहील यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरू प्रा.ई वायुनंदन यांच्याकडे दिला आहे.
कुलसचिवांनंतर लेखाधिकारी यांच्याही एकाच दिवशी दिलेल्या राजीनाम्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या मोठ्या प्रमाणातील खर्चाच्या मंजुरीस विरोध केल्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढल्याने गोहील यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. सुमारे पाच कोटी रूपयांचा खर्च या उत्तरपत्रिकांसाठी दाखवण्यात आला आहे. सिनेट सदस्यांनी सभेत या खर्चास विरोध केला होता. बुधवारीही व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती.
वित्त लेखाधिकारी गोहील यांनी या खर्चाच्या मान्यतेस नकार दिला आहे. दरम्यान लेखाधिकारी गोहील यांच्याशी संपर्क साधला असता गुरुवारी आपण आपली भूमिका व माहिती सादर करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.