जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२६ । सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून उन्हाच्या तीव्रतेने यंदाच्या हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रविवारी, २६ एप्रिल रोजी जळगावचे तापमान तब्बल ४४°C वर पोहोचले असून, ही या हंगामातील सर्वोच्च नोंद ठरली आहे. गेल्या पंधरवड्यापासून ४१ ते ४२ अंशांवर स्थिरावलेला पारा आता थेट ४४ अंशांच्या पार गेल्याने जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.

उष्णतेचा परिणाम केवळ दिवसा नव्हे तर रात्रीही जाणवत आहे. रात्रीचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यामुळे घरांमध्ये कूलर असूनही नागरिकांना उष्णतेपासून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. २४ एप्रिल रोजी ४२ अंश, २५ एप्रिल रोजी ४३ अंश, तर २६ एप्रिल रोजी ४४ अंश अशी सलग वाढ नोंदवली गेली आहे.

काल रविवारी तापमान यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला आहे. रविवारी सुटीचा दिवस असूनही तीव्र उष्णतेमुळे जळगावकरांनी घराबाहेर पडणे टाळले. दुपारी शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. उष्णतेच्या लाटेमुळे जणू अघोषित लॉकडाऊन पुकारल्याचे चित्र शहरात दिसत होते. दुपारी काही अंशी ढगाळ वातावरण असूनही उकाडा कमी नव्हता. रविवारी रात्री ८ वाजेपर्यंतही जळगावात उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत होत्या. सामान्यतः सूर्यास्तानंतर हवेत थोडा गारवा निर्माण होतो, मात्र यंदा जमिनीत साठलेली उष्णता बाहेर पडत असल्याने आणि गरम वारे वाहत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
असं राहणार आगामी पाच दिवस तापमान?
दिनांक आणि तापमानाचा अंदाज
२७ एप्रिल : ४४ अंश
२८ एप्रिल : ४३ अंश
२९ एप्रिल : ४३ अंश
३० एप्रिल : ४४ अंश
१ मे : ४३ अंश






