जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा आता तीव्र झाला असून पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिला आठवडा संपताच उन्हाने रौद्र रूप धारण केल्याने जळगावकर घामाघूम झाले असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस तापमान अधिक चढे राहण्याचे संकेत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. काल रविवारी तापमान ४१.६ अंश सेल्सिअस इतके होते. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. गेल्या वर्षी ९ एप्रिलला ४३.७ अंश तापमान नोंदवले गेले होते, तर यंदा ११ एप्रिललाच पाऱ्याने चाळिशी पार केल्याने उष्णतेची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे मुख्य बाजारपेठा आणि महामार्गावर दुपारच्या सत्रात वर्दळ कमालीची घटली आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत उकाड्याचा कळस गाठला असून संध्याकाळी ७ वाजतादेखील वातावरणात उष्णतेची झळ कायम आहे. नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी टोपी, रुमाल आणि स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत.
आता पुढे काय?
पुढील दोन दिवस तापमान अधिक चढे राहण्याचे संकेत आहेत. तसेच येत्या सहा दिवसांत तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान राहणार असून ‘उष्णतेची लाट’ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







