जळगावकरांनो काळजी घ्या : जळगावात राज्यातील सर्वाधिक कमी तापनमानाची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । मागील गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. संपूर्ण राज्यभरातील किमान तापमान खाली घसरले आहे. त्यामुळे सर्वत्र जास्त गारठा जाणवत आहे. दरम्यान, मंगळवारी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जळगावात सर्वाधिक कमी तापनमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगावात ५.३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. Jalgaon Recorded the Lowest Temperature in Maharashtra

राज्यभरात थंडीची लाट वाढतच चालली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्याने संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. तापमानात सातत्याने घट होत असल्याने याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. दाट धुक्यांमुळे विमान आणि ट्रेन धीम्या गतीने सुरू आहेत.

सकाळी ६ ते ७ पर्यंत धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. सरासरी तापमानापेक्षा पारा खाली घसरल्याने जळगावकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. ३१ डिसेंबर आधी राज्यात असाच थंडीचा तडाखा बसला होता. मात्र नंतर काही दिवस वातावरणात थोडी उष्णता जाणवू लागली होती. अशात आता पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडल्याने जळगावात ५.३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.