⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

पुन्हा हुडहुडी : जळगावात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ फेब्रुवारी २०२३ | गेले काही दिवसांपासून राज्यातली थंडी गायब झाली होती. मात्र गत ४८ तासात राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा घसरल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. राज्यात सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे झाली आहे. जळगावला शनिवारी ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. पुढील आठवडाभर गारठा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमानातील हा फरक लहान मुले आणि वृद्धांसाठी आजारांना निमंत्रण देणारा ठरणार आहे. दुसरीकडे थंडीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, द्राक्ष, मका या पिकांसाठी मात्र पोषक वातावरण ठरणार आहे.

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, आता उत्तर भारत आणि राजस्थानामध्ये थंड वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठताना दिसतो आहे. उत्तर भारत आणि राजस्थानमधल्या थंड वार्‍यांनी महाराष्ट्राचे तापमान घसरले आहेत. त्यात परभणी ८.२, नागपूर – ९.४, औरंगाबाद – ९.६, यवतमाळ – १०.०, पुणे – १०.३, अमरावती १०.५, अकोला – १०.६, गोंदिया १०.८, वर्धा ११.२, चंद्रपूरचे तापमान ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. जळगावचा पारा ७.७ अंशापर्यंत खाली आला आहे. येणार्‍या काळात थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यात गुरुवार-शुक्रवारपासून थंडीचे पुनरागमन झाले असून पुढील आठवडाभर थंडी कायम राहणार आहे. जिल्ह्यात या वर्षी जानेवारीचा पहिला आठवडा वगळता संपूर्ण हिवाळ्यात फारशी थंडी जाणवली नाही. वातावरण सतत बदलत राहिल्याने त्याचा पिकांवरही परिणाम झालेला दिसून आला. त्यातच गेल्या १५ दिवसांपासून गारठा गायब झाला होता. मात्र आता पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उत्तरेकडील थंड वार्‍याचा हा परिणाम असून पुढील आठवडाभर पारा घसरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशभरात अनेक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यात उत्तराखंड, तामिळनाडू, केरळचा दक्षिण भाग, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, या भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी होत असून थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावरही होताना दिसत आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1621717139014176771