सावधान! जळगावसह ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही महत्वाचे : हवामान खात्याकडून अलर्ट जारी
जळगाव लाईव्ह न्यूज : 22 सप्टेंबर 2023 : दोन तीन दिवसाच्या विश्रांती नंतर जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस परतला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांना ढगांच्या गडगडाचा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जाहीर केला आहे. दरम्यान, येत्या काही तासात जळगावसह काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
आज या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर , जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या काही तासांत जळगावसह रायगड, रत्नागिरी, बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय.
तसेच , आज विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळेल. यापार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून पावसाने उसंती घेतली होती. पावसाने उघडदीप देताच उन्हाचा चटका वाढला होता. यामुळे असह्य उकाडा जाणवत होता. मात्र गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे.