जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२५ । जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कर भरावा म्हणून जळगाव महापालिकेने एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्यांना करात १० टक्के सूट देण्याची घोषणा महापालिकेने केलीय. खरंतर महापालिकेकडून १ एप्रिलपासून १० टक्के सूट देण्याची योजना लागू केली जाते. यंदाही तशी घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात नागरिक प्रभाग समिती कार्यालयात गेल्यावर तेथे भरणाच स्वीकारला जात नव्हता. काही संस्था व सरकारी कार्यालयांचे धनादेश न वटल्याने यंदा सूटची ही योजना तब्बल २० दिवस उशिराने राबविली जात आहे. २१ ते ३० एप्रिल अशा दहा दिवसांसाठी योजना लागू केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनश्री शिंदे यांनी दिली.

यंदा महापालिकेला वसुलीत शंभरीही गाठता आलेली नाही. मार्च अखेरपर्यंत फक्त ९६ कोटीचीच वसुली झाली. एमआयडीसी आणि शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याने त्याचा परिणाम वित्त आयोगाच्या अनुदानावरही झालेला आहे. २०२३-२४ मध्ये ११२ कोटींची वसुली झाली होती तर, २०२४-२५ मध्ये ९६ कोटींचीच वसुली झाली आहे.
महिलांना ५ टक्के जास्तीची सवलत
दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरणाऱ्यांना १० टक्के सूट महानगरपालिकेकडून देण्यात येते. त्यामुळे १० ते १५ कोटी रुपयांची वसुली एप्रिल महिन्यात होत असून यामध्ये नागरिकांना १० टक्के सवलतीचा लाभ होत असतो. तसेच मालमत्ता महिलेच्या नावाने असेल तर, त्या महिलांना आणखी ५ टक्के सवलत देण्यात येते म्हणजे एप्रिल महिन्यात महिलेच्या नावाने असलेल्या मालमत्तेचा कर भरला तर, त्या महिलांना १५ टक्के सवलत मिळत असते.
त्यामुळे बऱ्याच मालमत्ताधारकांकडून एप्रिल महिन्यात कर भरण्यास प्राधान्य देण्यात येते. परंतु यंदा महापालिकेच्या महसूल विभागाने आगाऊ कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. आता २१ एप्रिलपासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र कर भरणासाठी आलेल्या अनेक नागरिकांना यापूर्वी कर न भरताच परतावे लागले आहे.