---Advertisement---
विशेष जळगाव जिल्हा राजकारण

जळगाव जिल्ह्यातील मतदारांचे विकासाला प्राधान्य; विरोधकांचे फुटीर, गद्दार मुद्दे प्रभावहीन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | डॉ. युवराज परदेशी | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची राज्यात मोठी पडझड झाली असतांना जळगाव जिल्हा हा भाजपाच्या पाठीशी उभा राहिला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव व पारोळा-एरंडोल येथे शिवसेनेचे (शिंदे गट) व अमळनेर येथे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार असलेल्या मतदारसंघातून स्मिताताई वाघ यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. याला खूप महत्व आहे. कारण राज्यातील भाजपाच्या तोडफोडीला जनता कंटाळली म्हणून भाजपाला फटका बसला असे म्हटले जात असतांना जळगावमधून मिळालेल्या यशाला महत्व आहे.

Jalgaon Loksabha 1 jpg webp

जळगाव मधून स्मिताताई वाघ व रावेर मधून रक्षाताई खडसे या दोन्ही जवळपास अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला. खान्देश हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी धुळे व नंदुरबारचे बुरुज कोसळले. मात्र जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे स्मिताताई वाघ  व रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांना पक्षांतर्गंत विरोधकाचा सामना करावा लागला होता, हे विसरून चालणार नाही. भाजपा जळगाव मतदारसंघातील ६ पैकी चार विधानसभा मतदारसंघात मित्रपक्षांवर अवलंबून असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात झालेल्या तोडाफोडीच्या राजकारणाचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

---Advertisement---

अपेक्षेप्रमाणे, निवडणुकीत प्रचारादरम्यान विरोधकांनी गद्दार, फुटीर, ५० खोके असे अनेक आरोप केले. यामुळे शिंदे गट व अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातून भाजपा ऐवजी उबाठा गटाला मते मिळतील, अशी हवा निर्माण झाली होती. जळगाव मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील हे शिवसेनेतून तर मंत्री अनिल पाटील हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले आहेत. म्हणजेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून सहा पैकी चार आमदार पक्षातून बाहेर पडून देखील फुटीर, गद्दार हे विरोधकांचे मुद्दे येथे प्रभावी ठरलेले नाहीत, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील शिंदे गटात आहेत. तेथूनही रक्षा खडसे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.

राज्य व देशात भाजपाविरोधी वातावरण, मराठा समाजाची नाराजी, तोडाफोडीच्या राजकारणावरून विरोधकांनी उठविलेलं रानं…अशी विपरित परिस्थित असतांना भाजपाला यश मिळण्याची कारणे निश्चितच महत्वाची ठरतात. यापैकी काही कारणांचा उल्लेख करावयाचा म्हटल्यास, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार, मित्रपक्षांनी प्रामाणिकपणे केलेले काम व सर्वात महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील सुज्ञ मतदार. विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी पाहता, मतदारांनी आपल्या मतदारसंघात झालेली विकासकामे व स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे दिसून येत आहे.

जळगाव ग्रामीणमधून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ६३,१४०चे मताधिक्य दिले आहे. पारोळा-एरंडोलमधून आमदार चिमणराव पाटील यांनी २२,०८५, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून किशोरआप्पा पाटील यांनी १६,५६६ तर अमळनेर येथून मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी ७१,०७० चे मताधिक्य दिले आहे. यामुळे या चारही मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीच्या तोडफोडीपेक्षा स्थानिक विकास व स्थानिक नेत्यांवर मतदारांनी जास्त विश्वास ठेवल्याचे दिसून येत आहे. हेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसले का? याचे उत्तर आगामी काळातच मिळेल!

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---