जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव पोलिसांनी जिल्हाभरात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या विरोधात राबविलेल्या दोन दिवसाच्या मोहित ५१२ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण ५१ लाख २० हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी अनेक लोक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. याच दरम्यान, नवीन वर्षाचे स्वागत सुरक्षित वातावरणात व्हावे, अपघातांना आळा बसावा आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे विशेष मोहीम नियोजित करण्यात आली होती.

जिल्हा पोलिसांनी दि. ३० व ३१ डिसेंबर रोजी राबविलेल्या ४८ तासांच्या ‘विशेष मोहिमेत’ मद्यपी ५१२ वाहनचालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली. न्यायालयास ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसमध्ये कमीत कमी प्रत्येकी १० हजाराचा दंड वसुलीची तरतूद आहे.

जळगावात दि. ३० डिसेंबर रोजी १७१ जणांकडून ३ लाख ३ हजार ८००, ३१ डिसेंबर रोजी ३४१ मद्यपींकडून ८ लाख ३८ हजार ३८६ रुपये दंड वसूल केला गेला. जळगाव शहर वाहतूक शाखेने ५७ महापींवर तर भुसावळ पोलिसांनी ४५, चोपडा पोलिसांनी २८, चाळीसगाव पोलिसांनी २४ मद्यपींवर कारवाई केली.
मोटर वाहन कायदा आणि नवीन भारतीय न्याय संहितामधील तरतुदीनुसार मद्य पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. यापुढेही जिल्ह्यात अशीच कडक मोहीम सुरू राहील. तरी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी केले आहे.

