जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलातील १७१ रिक्त पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पुरुष आणि महिला मिळून एकूण ३,८९७ उमेदवार पात्र ठरले. काही दिवसांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया काल २२ फेब्रुवारी रोजी अंतिम टप्प्यात पूर्ण झाली.

भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांचा उत्साह दिसून आला. १७१८ महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी १२२४ उमेदवार हजर राहिल्या. यामध्ये १६९ उमेदवार शारीरिक मोजमापात(वयोमर्यादेसह) तर मैदानी चाचणीत ६८४ उमेदवार अपात्र ठरल्या. ३७१ महिला उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या. शेवटच्या दिवशीही चोख बंदोबस्त आणि नियोजनामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. नियमानुसार रिक्त १७१ जागांसाठी आता १:१० या प्रमाणात प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यातून निवडक उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होऊन यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.








