‘ऑपरेशन ऑल आऊट’ची जळगाव पोलिसांची धडक मोहीम; एका दिवसात हजारो कारवाया

जून 6, 2026 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांच्या वतीने दि. ५ जून रोजी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही अत्यंत धडक आणि विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी धाडसत्र आणि तपासणी मोहीम राबवून पोलिसांनी गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

allout

दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल १९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ लाख ६५ हजार ६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध ५६ गुन्हे, तर जुगार अड्ड्यांवर कारवाई करत ७६ गुन्हे नोंदवून ४६ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शस्त्र अधिनियमांतर्गत ४ गुन्हे, अमली पदार्थ सेवन प्रकरणी १० गुन्हे, तर COTPA कायद्यांतर्गत २०३ कारवाया करण्यात आल्या. मोहिमेदरम्यान ३४ बेपत्ता महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करत कलम २८५ अंतर्गत २२ गुन्हे, कलम १२६ अंतर्गत २०१ बाँड, कलम १२९ अंतर्गत १७ बाँड, तसेच कलम १२२/१२४ अंतर्गत संशयास्पद वास्तव्याच्या ५ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठी मोहीम राबवत १,४४३ वाहनांवर कारवाई करून ९ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३७ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

याशिवाय तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ५ जणांना पकडण्यात आले, २०८ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली, ४२ अटक वॉरंट आणि ५२ जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच अवैध वाळू वाहतुकीच्या ६ प्रकरणांवर कारवाई करत २ फरार व वाँटेड आरोपींना अटक करण्यात आली.

जळगाव पोलिसांच्या या व्यापक मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसण्यास मदत होणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now