जळगाव लाईव्ह न्यूज । लोकसभेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर खासदार स्मिताताई वाघ (Smita Wagh) यांना सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या संसदीय कामकाजातील सक्रिय सहभाग, जनतेच्या प्रश्नांवरील प्रभावी मांडणी आणि सातत्यपूर्ण लोकहिताच्या कामाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला.

ज्युरी समितीने संसद रत्न पुरस्कार २०२६ साठी १० लोकसभा खासदार, दोन राज्यसभा खासदार आणि संसदीय स्थायी समित्यांच्या चार सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही लोकसेवेचा ध्यास न सोडणाऱ्या जळगावच्या खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्यासह पुण्यातील मेधा कुलकर्णी या दोन महिलांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही स्मिताताई वाघ यांना हा पुरस्कार मिळाला होता. सलग दुसऱ्यांदा या राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव जिल्ह्याचा गौरव तर वाढवलाच आहे, पण त्याचसोबत राजकारणापलीकडे जाऊन लोकसेवेचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ देशासमोर ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत तब्बल ९६ टक्के उपस्थिती नोंदवली. तसेच २६९ प्रश्न उपस्थित करून विविध लोकहिताच्या विषयांना वाचा फोडली. याशिवाय ५३ चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडले. तसेच पाच खासगी विधेयके सादर करत संसदीय कार्यात सक्रिय भूमिका बजावली.
त्यांच्या समर्पित, अभ्यासू आणि जनतेप्रती उत्तरदायी कार्यशैलीमुळे हा मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असून, जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








