जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील बावीस हजार हेक्टरच्या जवळपास कापसाचे लागवड क्षेत्र असुन परिपक्व झालेल्या कैऱ्या उमलण्याआधी सडुन कापुस उत्पादकांचे मोठे नुकसान होऊन खरीपाची इतर पिकेही अतिवृष्टीमुळे हातची वाया गेल्याचे वृत्त दि. २४ सप्टेंबर रोजी “जळगांव लाईव्ह न्युज” ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दाखल घेत प्रशासनातर्फे दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक असे ८२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. तालुक्यात बावीस हजार हेक्टरच्या जवळपास कापसाचे लागवड क्षेत्र असुन परिपक्व झालेल्या कैऱ्या उमलण्याआधी सडुन कापुस उत्पादकांचे मोठे नुकसान होऊन खरीपाची इतर पिकेही अतिवृष्टीमुळे हातची वाया गेली आहेत. दरम्यान, तालुक्यात झालेल्या या नुकसानीबाबत “जळगांव लाईव्ह न्युज”ने दि २४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वास्तवदर्शक वृत्त सर्वप्रथम, तंतोतंत मांडले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने पिकविमा कंपनीकडे झालेल्या नुकसानीची माहीती ७२ तासाच्या आत कळविण्याचे आवाहन केले होते. तसेच आमदार चंद्रकात पाटील यांनीही तालुक्यातील काही ठिकाणी नुकसानग्रस्त शिवारांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतीबांधावर जाऊन पहाणी केली होती व प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीबाबत कळवित पंचनाम्यांचे आदेश दिले होते.
दोन दिवसात पंचनामे करण्याचे आदेश
मुक्ताईनगर तालुक्यात दि. २७ व २८ रोजी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. जिल्हा कृषी अधिकारी यांच्या आदेशान्वये दि. ३० रोजी पुर्ण तालुक्यात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक असे ८२ कर्मचारी नियुक्त केले असुन संबंधित कर्मचाऱ्यांकडुन आजपासुन (दि.३०) दोन दिवस पंचनामे करण्याचे काम करण्यात येणार आहे.