जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२५ । भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अवैध फेरीवाले बिनधास्त खाद्यपदार्थ विकताना दिसत असून यातच रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहे. अशातच कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून पैशाची बॅग लांबविणाऱ्या आंतरराज्यीय चार जणांच्या टोळीच्या जळगावच्या एलसीबी पथकाने मुसक्या आवळल्या आहे. या कारवाईत साडेचार लाख रुपयांचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या यशस्वी कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत असे की, रावेर रेल्वे स्थानकावर दि ९ सप्टेंबर रोजी कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हे प्रवास करत असताना आरोपी किरण पंडित हिवरे (वय ३२), अजय सुपडू कोचुरे (वय २५), हरीश अनिल रायपुरे (वय २५) आणि गोकुळ श्रावण भालेराव (वय २७) यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि पळून गेले.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रेल्वेत दरोडा टाकणारे हेच आरोपी जळगाव शहरातील जी.एस. ग्राऊंड येथे चोरीच्या पैशांची वाटणी करण्यासाठी एकत्र येणार होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना ही माहिती मिळताच, त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश देत पथकाने गुरुवारी रात्री ९ वाजता सापळा रचून चौघांनाही अटक केली.
चौघा संशयित आरोपींकडे असलेल्या पिशवीत साडेचार लाख रुपये आढळले. पोलीस चौकशीत या आरोपींनी रेल्वेत दरोडा टाकल्याची कबुली दिली. जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले.








