जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३। शहरातील मजुरी करणारी व रस्त्यावर भेटेल तेथे निवारा शोधून उघड्यावर राहणारी एक आदिवासी महिला रस्त्यावरच प्रसूत झाली. मजुरी करून पोट भरणे हेच तिचे काम होते. ही महिला गुरुवारी सकाळी अमळनेर येथील तिरंगा चौकात प्रसूती झाली. कळांनी विव्हळणाऱ्या या महिलेकडे पाहून हालहाल करून तर काही लोक दुर्लक्ष करून निघून जात होते.परंतु, मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
चौकात असणाऱ्या महाजन रेस्टॉरंटचे मालक भाऊसाहेब महाजन यांना परिस्थितीची तात्काळ जाण झाली. त्यांनी तत्काळ रिक्षा बोलावली, पैसेही देऊ केले. मात्र, सकाळी-सकाळी रक्ताने रिक्षा भरेल म्हणून कोणीही पुढे आले नाही. दोन-तीन महिला जवळून गेल्या. मात्र, त्याही पाहून निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला. तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली. मात्र, कोणीही मदत करीत नव्हते.
एका अनोळखी महिलेने पुढे येत मदत केली, तर काही जणांनी चादर आणली. त्यात नवजात बालकाला गुंडाळले. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका आली. डॉ. इम्रान कुरेशी यांनी बाळ आणि माता यांच्यावर प्रथमोपचार केले. काहींनी पुढे येऊन रुग्णवाहिका आणि आर्थिक हातभार लावत रुग्णालयात दाखल केले. बाळ, बाळंतीण आता सुखरूप आहेत. या घटनेमुळे मात्र सामाजिक भान हरपल्याचे दिसून येते.
एक वर्षापूर्वी या महिलेला पोटच्या गोळ्याला विकताना पकडण्यात आले होते. पोलिसांना आपबिती सांगताना अनेकांचे डोळे पाणावले होते. कोरोना काळात तिचा पहिला पती मृत झाला. तरी एकापाठोपाठ तिला सात मुले झाली होती. त्यांचे पोट भरणे कठीण झाल्याने तिने स्वतःच्या पोटचे गोळे विकण्याचा निर्णय घेतला होता. तिला महिला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा ती प्रसूतकळांनी विव्हळत होती. तिला मुलगा झाला असून, ग्रामीण रुग्णालयात बाळ व तिच्यावर उपचार करण्यात आले. तिची प्रकृती सुधारली आहे. या महिलेची आधीची सात मुले एरंडोल आश्रमशाळेत टाकण्यात आली आहेत.