दूध संघाच्या मतदानाला सुरुवात, महापौरांनी उमेदवार सासूसह बजावला हक्क

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक यंदा चांगलीच गाजत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदानास आज सकाळपासून प्रारंभ झाला आहे. जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेल्या सासू मालतीबाई सुपडू महाजन यांच्यासह सकाळी जळगाव केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी देखील जळगावात मतदानाचा हक्क बजावला आहे.

जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाची आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आज मतदान पार पडत आहे. यंदाची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली असून एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार आहे. पाचोरा तालुक्यातून आ.किशोर पाटील यांच्या माघारीने माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत आहे. यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

शेतकरी पॅनलमध्ये दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी, मनपा महापौर जयश्री महाजन यांच्या सासूसह मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. अमळनेर व चोपडाच्या ७८ मतदारांसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतदान केंद्र आहे. भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरच्या ४४ मतदारांसाठी म्युन्सिपल हायस्कूल, जामनेर रोड भुसावळ हे मतदान केंद्र आहे. चाळीसगावच्या ५९ मतदारांसाठी हिरुभाई हिमाभाई पटेल प्रथमिक विद्यालय चाळीसगाव हे मतदान केंद्र आहे. एरंडोल, धरणगाव व पारोळाच्या ६७ मतदारांसाठी एरंडोल येथील सूर्योदय जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, दत्त कॉलनी हे आहे. रावेर यावलच्या ६० जागांसाठी म्युन्सिपल हायस्कूल अँँड ज्युनिअर कॉलेज फैजपूर येथे मतदान होणार आहे.

जळगाव व जामनेरच्या ५७ मतदारांसाठी मतदान केंद्र जळगाव येथील रिंग रोडवरील श्री सत्यवल्लभ हॉल हे असणार आहे. तर पाचोरा, भडगावच्या ७६ मतदारांसाठी श्री गो. से. हायस्कूल पाचोरा येथे मतदान केंद्र असणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर आज सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार आहे.

जिल्हाभरात सकाळी आठ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिग्गज सकाळीच केंद्रावर पोहचत आहेत. जळगाव मतदारसंघातून विद्यमान पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्याविरुद्ध जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या आई मालतीबाई सुपडू महाजन या रिंगणात उतरल्या आहेत. जवळपास सर्वच मतदारसंघात काटे की टक्कर होणार असून मतमोजणी उद्या होणार आहे. जळगावातील केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेल्या सासू मालतीबाई सुपडू महाजन यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे.