जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । नाशिक येथील महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरक्षित असून त्याबाबत दररोज आढावा घेऊन दैनंदिन तपासणी केली जाते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन नियोजन समिती गठीत आहे. त्या समितीद्वारे ऑक्सिजनबाबतच्या कार्यवाहीचा दैनंदिन आढावा घेतला जातो. रुग्णालयासाठी २० के.एल.चा ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आला असून याद्वारे मध्यवर्ती प्राणवायू प्रणालीद्वारे रुग्णालयातील सुमारे ३२५ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. तसेच सी २ येथे ६४ रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर द्वारा पुरवठा होतो.
ऑक्सिजन टॅंकची पाईपलाईन दररोज २ तंत्रज्ञ तपासण्याचे काम करीत असतात. त्यांना प्रत्येकी १२ तासाची ड्युटी नेमून दिलेली असून प्रत्येक वॉर्डात जाऊन ते पाइपलाइन सारखी तपासतात. त्यामुळे किरकोळ दुरुस्ती देखील तत्काळ होते. ऑक्सिजन नियंत्रणासाठीं जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासन यांच्या समन्वयाखाली जिल्ह्यात ऑक्सिजन नियोजन सुरु असते. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणारे ठेकेदार यांच्याशी सातत्याने संवाद असल्याने व एक दिवसाआड ऑक्सिजन टँकर येत असल्याने शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनविषयी कुठलीच कमतरता जाणवत नाही, अशीदेखील माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
रुग्णालयात जर ऑक्सिजन टॅंकला अडचण निर्माण झाली तर अतिरिक्त सिलेंडरदेखील कार्यरत आहेत. तत्काळ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाईल अशी बॅकअप प्रणाली आहे. दररोज दिवसातून कमीत कमी २ वेळा ऑक्सिजनची पाहणी मी स्वतः करतो असेही अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.