जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२५ । सोने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मागच्या काही महिन्यांपासून आकाशाला गवसणी घालणाऱ्या सोन्याच्या किंमती आता खाली येण्यास सुरुवात झाली आहे. जळगाव सराफा बाजारात एक लाखांचा टप्पा पार केलेल्या सोन्याच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे.

बुधवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोने दरात २४०० रुपयाची तर २२ कॅरेट सोने २२०० रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ८८,५५३ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९६,६०० रुपये प्रति १० इतका आहे. तर चांदीमध्ये एक हजार १०० रुपयांची वाढ होऊन ती ९७ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
काही दिवसापूर्वी सोने दर जीएसटीसह एक लाखाच्या वर गेला होता. यामुळे लग्न सराईत वाढलेल्या किंमतींनी वधू-वराकडील मंडळी चिंतेत सापडली आहे. मात्र आता त्यात घसरण होताना दिसत आहे. त्यातच सोन्यात येत्या काही वर्षात मोठ्या घसरणीचे संकेत पण काही तज्ज्ञ देत आहेत. त्यांच्या मते सोने प्रति 10 ग्रॅम 55 हजार रुपयांपर्यंत खाली घसरणार आहे. त्याची चुणूक वायदे बाजारात दिसून आली.
दरम्यान, अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध काहीसे सौम्य होण्याची शक्यता निर्माण झाली असून, तशी तयारी अमेरिकेनेही दाखविली आहे. त्यामुळे सोने भाव कमी झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.