जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२६ । सोने चांदीचे दर गगनाला भिडले असून दोन्ही धातूंचे दर ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. मात्र, आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत.

जळगाव सराफ बाजारात मागच्या २४ तासात चांदीच्या दरात तब्बल ६१८० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचे प्रती किलो दर २,४९,२६० रुपयांवर आले आहेत. चांदी सोबतच गुरुवारी सोन्याच्या दरातही घसरण झाली.सोन्यात प्रति दहा ग्रॅमला म्हणजेच १ तोळ्यामागे ७२१ रुपयांची घट झाली आहे. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १, ४०, २८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

तीन दिवसात चांदीत १८,९६५ रुपयांची घसरण
चांदीच्या दरात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोमवार वगळता उर्वरित तिन्ही दिवस घसरण सुरु आहे. सोमवारी चांदी ४२२० रुपयांनी वाढली. त्यानंतर मंगळवारी ९१७० रुपयांची बुधवारी ३६१५ तर गुरुवारी ६१८० रुपयांची अशी तीन दिवसात एकूण १८,९६५ रुपयांची घसरण नोंदवली गेली. वाढलेल्या भावाला बाजारपेठेचा आधार नसल्याने आलेले करेक्शन असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.








