जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दराने मोठा पल्ला गाठला होता. या आठवड्यात देखील दोन्ही धातूंमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजार पेठेत मागील दोन दिवसात सोने दरात एक हजार रुपयाची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदी देखील हजार रुपयांनी वधारली आहे. या दरवाढीने सोन्याचा दर विनाजीएसटी ७५ हजाराच्या जवळ आला आहे. तुम्हीही आज सोने चांदी खरेदीला जाणार असाल तर आजचे दर तपासून घ्या..
आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरु आहे. जळगावमध्ये गणेत्सवापूर्वी सोन्याचा दर ७२ हजाराच्या घरात होता. तर चांदी दर ८४ हजार रुपयावर होता. मात्र त्यांनतर दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली.
गेल्या आठवड्यात झालेल्या दरवाढीनंतर या आठवड्यात देखील सोने चांदीचे दर महागले आहे. मागील दोन दिवसात सोने १००० रुपयांनी वाढले. यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,८०० रुपये रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर ७७ हजार रुपयावर पोहोचला आहे. तसेच चांदीचा दर ९०,००० रुपये प्रति किलोवर गेला आहे. जीएसटीसह चांदी ९२७०० रुपयावर पोहोचली आहे.
विनाजीएसटी सोन्याचे दर ७७ हजारांवर पोहोचणार
अमेरिकेच्या फेडरल बँकेने ठेवीवरील व्याजदर घटवला आहे. परिणामी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर वाढले. दरम्यान, महिनाभरात सोन्याचे दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?
सध्या पितृपक्ष सुरु आहे. या दरम्यान सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.