जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२५ । सध्या सोने दरवाढीने कहर केला असून जळगावच्या सराफ बाजारात १६ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात सोने प्रति तोळा १३०० रुपयांनी वाढून प्रथमच विनाजीएसटी ९४ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे ऐन लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

अमेरिका-चीनमधील वाढत्या व्यापार युद्धाच्या भीतीपोटी गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसत आहे. सोबतच चांदीने पण ग्राहकांचे डोळे पांढरे केले आहेत.
बुधवारी जळगावच्या सराफ बाजारात सोने दरात १३०० रुपयांची वाढ झाली. यामुळे २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८६,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर २४ कॅरेट सोने दर ९४६०० (जीएसटीसह ९७४३८) रुपयांवर पोहोचले. चांदी दोन दिवसांपासून ९७ हजार रुपये किलोवर स्थिरावली आहे.इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, लवकरच सोने १ लाखांचा टप्पा पार करेल.
१ जानेवारी २०२५ पासून १६ एप्रिलपर्यंत सोन्यात ३४ वेळा दरवाढ झाली आहे. १ जानेवारीला शुद्ध सोन्याचे दर ७६९०० रुपये तोळा (जीएसटीसह ७९२०७) होते. तेजीच्या या रॅलीने १६ एप्रिलला सोने ९४६०० रुपयांवर पोहोचले. या काळात सोने १७७०० रुपयांनी वाढले आहे.