⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | विकासाच्या महामार्गापासून जळगाव पुन्हा दूर! वाचा स्पेशल रिपोर्ट

विकासाच्या महामार्गापासून जळगाव पुन्हा दूर! वाचा स्पेशल रिपोर्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ डिसेंबर २०२२ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७०१ किलोमीटरच्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच झाले. समृध्दी महामार्गात नागपूर, वर्धा, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाला पंख लाभतील यात शंका नाही. शिंदे-फडणवीस सरकार येत्या ५ वर्षात राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांना जोडण्याच्या आशेने सुमारे ३,००० किमी लांबीचे १० महामार्गांचे जाळे तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची एकूण गुंतवणूक ३ लाख कोटी रुपये राहणार आहे. मात्र यात जळगाव जिल्ह्याला कितपत फायदा होईल? हा मोठा प्रश्‍न आहे. कारण पुढील पाच वर्षात तयार होणार्‍या महामार्गांच्या जाळ्यात जळगावचा थेट संबंध येत नाही.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हाती घेत असलेल्या या सर्व प्रकल्पांपैकी सर्वात लांब आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा नागपूर-गोवा महामार्ग आहे, ज्याला ‘शक्तीपीठ एक्सप्रेसवे’ म्हणून लोकप्रिय करण्याची योजना आहे. सुमारे ७६० किमीचा, शक्तीपीठ द्रुतगती मार्ग नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गापेक्षाही लांब असेल. शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग ११ जिल्ह्यांमधून जाणार असून, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील भाग एकमेकांना जोडणार आहे. महाराष्ट्र-गोवा सीमेवर असलेल्या वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे जोडले जातील.

एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, शक्तीपीठ एक्स्प्रेसवे बहुतेक विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील त्या भागांना कव्हर करेल ज्यांना नागपूर-मुंबई महामार्ग स्पर्श करत नाही. नागपूर-गोवा एक्स्प्रेस वे व्यतिरिक्त, एमएसआरडीसी विदर्भातील कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी जालना-नांदेड आणि जालना-नाशिक यांना नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, नागपूर-गोंदिया, गोंदिया-गडचिरोली आणि गडचिरोली-नागपूर महामार्ग यासारख्या प्रकल्पांवर काम करत आहे. यासह केंद्र राबवत असलेले काही इतर महामार्ग प्रकल्प – सुरत-चेन्नई एक्स्प्रेसवे, औरंगाबाद-पुणे आणि पुणे-बंगलोर महामार्ग देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवतील.

जळगाव जिल्ह्यातील कोणते रस्ते पूर्ण कोणते अपूर्ण?
जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धुळे- जळगाव या टप्प्यात फागणे ते तरसोद व जळगाव- मलकापूर टप्प्यात तरसोद ते चिखली अशा दोन टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पैकी तरसोद- चिखली टप्प्यातील काम पूर्ण होऊन नशिराबादजवळ टोलनाके सुरू झाले व टोल वसुलीची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. फागणे- तरसोद टप्प्यातील काम अद्याप निम्मे अपूर्ण असून येत्या वर्षभरात ते पूर्ण होणार आहे. औरंगाबाद- जळगाव या १५० किलोमीटर रस्त्याचे कामही बर्‍यापैकी पूर्ण झाले आहेत. जळगाव- पाचोरा- भडगाव- चाळीसगाव या रस्त्याचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण आहे. तर जामनेर- बोदवड- मुक्ताईनगर या राज्य महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. महामार्गावर वराड- मुसळी फाट्यापासून धरणगाव व पुढे धरणगाव- अमळनेर, अमळनेर- फागणे या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे.

भविष्यात हा आहे दिलासा
राज्य सरकारच्या नियोजनानुसार येत्या पाच वर्षात जळगाव जिल्ह्याच्या झोळीत फारसे काही पडणार नसले तरी दिलासादायक बाब म्हणजे, एमएसआरडीसीच्या ६५० किमीच्या प्रस्तावित महामार्गाद्वारे नाशिक-धुळे-जळगाव-अमरावती-नागपूरला जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात १२५ किमीच्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचा आणि २४० किमीच्या शेगाव-अकोला-नांदेड महामार्गाचाही समावेश आहे. या कामांमुळे जळगाव जिल्ह्याच्या रस्ते कनेक्टिव्हीटीला फायदा होणार आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.