तापी नदीच्या पुलावर गाडी लावली अन्.. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सुप्रसिध्द डॉक्टराचे धक्कादायक पाऊल
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. मात्र याच दिवशी जळगावातील एका सुप्रसिध्द डॉक्टराने तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दलितमित्र डॉ.व्ही.आर.पाटील (७५, रा.पाळधी ता.धरणगाव) असे मयत डॉक्टरांचे नाव असून त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेमकी घटना काय?
पाळधी येथील रहिवासी डॉ व्ही. आर पाटील हे मंगळवारी त्याच्या कारने चोपडा तालुक्यात असलेल्या निमगव्हाण येथील तापीनदीच्या पूलावर गेले. याठिकाणी त्यांनी पूलावर त्यांची कार उभी केली. त्यानंतर डॉ. पाटील यांनी पूलावरुन तापी नदीपात्रात उडी घेतली. पुलावर उभी असलेल्या कारवरुन पूलावरुन उडी घेणारी व्यक्ती ही डॉ व्ही आर पाटील हे असल्याची ओळख पटली. त्यानुसार पाळधी येथे घटनेची माहिती कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती.
पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही. आर. पाटील ओळखले जातात. त्यांचा पाळधी येथील मेन रोडवर कस्तुरबा नावाचे हॉस्पिटल आहे. त्यांनी श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती. तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.