जिल्ह्याला आज नवीन लसींचा साठा उपलब्ध होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात गर्भवती महिलांसाठी लसीकरण माेहीम राबवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थींना शासकीय केंद्रावर लस उपलब्ध नाही. मात्र, असे असले तरी सर्वसामान्यांसाठी शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्याला नवीन लसींचा साठा उपलब्ध हाेऊन शनिवारपासून लसीकरण हाेईल.
जळगाव जिल्ह्याला नाशिक विभागाकडून लसीचा पुरवठा हाेताे. पुणे येथील वितरण केंद्राकडे नाशिक विभागाची गाडी रवाना झाली आहे. ती शुक्रवारी नाशिकला लसींचे डाेस घेऊन परतेल. त्यानंतर ते जिल्ह्याला दुपारून प्राप्त हाेतील. दरम्यान, गेल्या पंधरवड्यात जिल्ह्याला केवळ १८ हजार डाेस प्राप्त झालेले असल्याने या वेळी अधिक डाेस मिळण्याची शक्यता आहे.
तर डाेस प्राप्त झाल्यानंतर शनिवारपासून लसीकरण माेहीम पुन्हा सुरू हाेईल, असे सूत्रांनी सांगितले. गर्भवती महिलांसाठी लसीकरणाची विशेष माेहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत गुरुवारी १३६९ महिलांनी पहिला तर ५८६ महिलांनी लसीचा दुसरा डाेस अशा एकूण १९५५ लाभार्थींनी लस घेतली, अशी माहिती गुरुवारी आराेग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.