जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२५ । मागच्या दोन आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून खरीप पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गेले १५ दिवस जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. दिवसा आणि रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत होता.श्रावणातही ऑक्टोबर हिटचा अनुभव देणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील खरीप पिके धोक्यात आली होती, अनेक ठिकाणी पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत होते. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा करीत आहे.

अशातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून यामुळे मान्सून सक्रिय होत आहे. वातावरणातील या बदलामुळे जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारपासून (दि. १४) सलग चार दिवस (१७पर्यंत) मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात १५ व १६ ऑगस्टला काही भागात दमदार पाऊस होऊ शकतो. दरम्यान १२ ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६६ टक्के पाऊस झाल्याने तब्बल ३६ टक्के तूट निर्माण झाली आहे. आता आगामी पाच दिवसात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून हा पाऊस जिल्ह्यातील पावसाची तूट भरून काढण्यास मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आगामी पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
दिनांक – हवामानाची स्थिती
१३ ऑगस्ट – काही अंशी ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता कमी
१४ ऑगस्ट – ढगाळ वातावरणासह तापमानातही घट शक्य
१५ ऑगस्ट – ढगाळ वातावरण, ठराविक तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज
१६ ऑगस्ट – दिवसभर ढगाळ वातावरण, मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज
१७ ऑगस्ट – दिवसभर ढगाळ वातावरण, मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज







