जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । जळगाव जिल्हा हा उष्ण तापमानासाठी ओळखला जातो, आणि मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४५ ते ४७ अंशापर्यंत जात असल्याने जळगावकर होरपळून निघतो. परंतु यंदा मे महिन्यात वातावरणात मोठा बदल झाला. आणि जळगावकरांना उष्णतेतून मोठा दिलासा मिळाला. कारण मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाच्या सावटामुळे जिल्ह्यातील तापमान ४० अंशाच्या खाली राहिले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही आठवडे जिल्ह्यात पावसाळी वातावरण कायम राहाण्याची शक्यता असून यामुळे ‘यंदाचा मे’ महिना उन्हाचा नसून पावसाचा ठरत आहे.

एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाल्याने जळगावकर होरपळून निघाले. मात्र मे महिन्यात जळगावकरांना दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यात ४ मेपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला असून तापमानाला मोठा ब्रेक लागला आहे. मे महिन्यात उन्हाचा पारा ४० अंशापेक्षा जास्तच असतो, मात्र यंदा ४ मेपासून जळगाव जिल्ह्यातील पारा ४० अंशाच्या खालीच राहिला आहे.
उन्हाळ्यातील ७३ पैकी ३९ दिवस पारा ४० च्या आत…
विशेष जिल्ह्यात मार्च ते मे या काळात उन्हाळा असतो. अनेकदा मार्चपासूनच पारा ४० अंशांच्या वर असतो. मात्र, यंदा मार्चमध्ये केवळ २ दिवस तापमान ४० अंशापेक्षा जास्त होते. मे महिन्यात १२ दिवसांत ८ दिवस तापमान ४० च्या खाली, तर ४ दिवस ४० च्या पुढे राहिले. एप्रिलमध्ये काही प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवला. एप्रिलमधील ३० दिवसांपैकी २८ दिवस पारा ४० च्या वर होता, तर केवळ २ दिवस खाली होता. एकूणच तीन महिन्यांचा विचार केल्यास, यंदा जळगावकरांना कमी उष्णतेचा उन्हाळा अनुभवायला मिळत आहे.
यंदा जळगाव जिल्ह्यासह राज्यातही सरासरीपेक्षा चांगला मान्सून राहण्याचा अंदाज आहे. मे मध्ये पाऊस झाला तरी त्याचा विशेष परिणाम मान्सूनवर होणार नाही, अशी माहिती हवामान तज्ज्ञ यांनी दिली.
आगामी ५ दिवस हवामान कसे राहील…
दिनांक… तापमान आणि वातावरणाची स्थिती…
१३ मे : तापमान – ३८ अंश….. मुख्यतः ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाची शक्यता
१४ मे : तापमान – ३९ अंश….. ढगाळ वातावरण, काही अंशी पावसाची शक्यता
१५ मे : तापमान – ३८ अंश….. ढगाळ वातावरण, ठराविक तालुक्यांमध्ये किरकोळ पाऊस
१६ मे : तापमान – ३९ अंश….. काही अंशी ढगाळ वातावरण
१७ मे : तापमान – ४० अंश….. काही अंशी ढगाळ वातावरण