जळगाव जिल्ह्यात हुडहुडी वाढली ; तापमानाचा पारा 9 अंशावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२३ । राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात अतिथंड वारे सुरू झाल्याने थंडीचा कडाका वाढला असून पुढील तीन दिवस ही लाट कायम राहणार असल्‍याचा अंदाज वर्तविला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा उच्च तापमानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा 9 अंशावर गेला आहे. सकाळी सर्वत्र दाट धुकेही होते. सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले नाही. स्वेटर, मफलर, जॅकेट सर्वच जण वापरताना दिसून आले. थंडीपासून बचावासाठी काही ठिकाणी शेकोट्या पेटविल्या गेल्या. दिवसभर चहाला मोठी मागणी होती.

जिल्ह्यात सुरू झालेली थंडीची लाट तीन ते चार दिवस राहील; असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सात जानेवारीपर्यंत कमीत कमी तापमान ९ ते ११ अंशांदरम्यान दरम्यान असेल. त्यानंतर मात्र अकरा ते पंधरा दरम्यान राहील. अधिक तापमान २४ ते २५ अंशावर असणार आहे.

या भागात पावसाची शक्यता
दरम्यान, एकीकडे थंडीचा कडाका वाढला असून महाराष्ट्रातील खान्देश नाशिक नगर पुणे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाली पावसानं हजेरी लावली आहे. त्या ठिकाणच्या रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.