जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. खत, बी, बियाणे याबाबत कोणतीही लिंकिंग केल्यास संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.याबरोबरच बनावट बियाणे विरोधात कारवाईसाठी जिल्ह्यात 15 तालुक्यात प्रत्येकी एक आणि जिल्हास्तरावर एक असे एकूण 16 भरारी पथक स्थापन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्ह्यातील जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असून टंचाई होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, खत-बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील खरीप हंगामासाठीची पेरणी क्षेत्र, बियाणे व खते उपलब्धता, सिंचन सुविधा, पीककर्ज वाटप, फळबाग लागवड, पीक विमा योजना आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात यंदा 7.69 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार असून, त्यापैकी 5.05 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीसाठी आरक्षित आहे.
पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश :
बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
हवामान यंत्रणा अद्ययावत करून आवश्यक ठिकाणी नवीन यंत्रे बसवावीत. सध्या जिल्ह्यात 86 स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत असून, आणखी 24 ठिकाणी केंद्रे उभारली जाणार आहेत.
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, 251 कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी 3.39 लाख मेट्रिक टन रासायनिक खत मंजूर असून, सध्या 1.45 लाख मेट्रिक टन खताचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा नियोजनबद्ध व वेळेत पुरवठा सुनिश्चित करावा.
शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी 1800 233 4000 हा टोल फ्री क्रमांक प्रभावीपणे कार्यान्वित ठेवावा.
“एक अधिकारी, एक गाव” अभियानांतर्गत जनजागृती शिबिरे आयोजित करावीत.
आधुनिक शेतीबाबत कार्यशाळा घेऊन पारंपरिक शेतीतून आधुनिकतेकडे वाटचाल करावी.
“कुकुंबर मोझॅक व्हायरस” संदर्भात पावसाळी हंगामात जनजागृती मोहीम राबवावी.
“एक जिल्हा – एक पिक” (केळी प्रक्रिया आधारित) या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.
बैठकीत आत्महत्याग्रस्त व अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मोफत बियाणे व खते देण्यासंदर्भातील कार्यवाही, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, ठिबक सिंचनाचे अनुदान, गाळमुक्त धरण-जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी, मनरेगाअंतर्गत कामे, तसेच सौर कृषी पंप जोडणीस गती देण्याबाबत सखोल चर्चा झाली.
महावितरण विभागाला शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. बागायती कपाशी पिकासाठी खराब ट्रान्सफॉर्मर व पोल तातडीने दुरुस्त करावेत, असे आदेशही देण्यात आले.
शेतकरी बांधवांसाठी पालकमंत्र्यांचे आवाहन :
उष्णतेपासून बचावासाठी सकाळी लवकर शेतीची कामे पूर्ण करावीत. 100 मिमी पावसाच्या नोंदीनंतरच पेरणी करावी. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी व धूळपेरणी टाळावी. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करावा व जैविक खतांना प्राधान्य द्यावे. बोगस कंपन्यांपासून सावध राहून बी-बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केले.
आ. अमोल पाटील व आ. अमोल जावळे यांनीही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत, बोगस कंपन्यांविरोधात तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावर कृषी विभागाने राज्यस्तरावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत दिले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी खरीप हंगामाचे पूर्ण नियोजनाचे सादरीकरण केले