जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२३ । गेल्या महिन्यात पावसाने राज्यातील अनेक भागाला झोडपून काढलं. सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी जळगाव जिल्ह्यात पावसाची (Jalgaon Rain) रिपरिप सुरूच आहे. शनिवारी दुपारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरु आहे.
आज कुठे पावसाचा अंदाज?
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर आज रविवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु पुणे, सातारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभाग सोडल्यास ८ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. तर कोकण विभागात 10 ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी असेल, असा अंदाज IMDने वर्तवला आहे.
दोन तीन दिवसांच्या खंडानंतर काल दुपारी ४ वाजेनंतर जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज पहाटपासूनच ढगाळ वातावरण आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला असल्यामुळे पिके चांगली बहरलेली आहे. तरीदेखील जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील काही लहान मोठा प्रकल्प खालीच आहे. त्यामुळे पाणी टंचाईची चिंता वाटू लागली आहे.