जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२४ । काही दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला देखील उद्यापासून दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे.
या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
खान्देशात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि वादळी वारे (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता जास्त आहे.