⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | कृषी | का रे भो…जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा इतका बोभाटा कशामुळे?

का रे भो…जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा इतका बोभाटा कशामुळे?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ.युवराज परदेशी । जळगाव जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात दूध संघ निवडणूक! दूध संघाच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे व भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात घमासान सुरू असल्याने ही दूध संघ निवडणूक चांगलीच रंगली आहे. निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यातील सर्वच दिग्गज राजकारणी उतरले आहेत. विशेष बाब म्हणजे आजपर्यंत सहकार क्षेत्रापासून दोन हात दूर राहणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वत: निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. दूध संघासाठी जळगावपासून मुंबईपर्यंत रणनीती आखली जात असल्याने या निवडणुकीला राज्य पातळीवर महत्व प्राप्त झाले आहे. (Jalgaon Dudh Sangh Election)

जळगाव जिल्हा दूध संघ व त्याच्या निवडणुकीला इतके महत्त्व का आहे? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. दुधाच्या महापूर योजनेअंतर्गत १९७१ मध्ये जळगावला (कै.) जे. टी. महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. सन १९७५ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले. जळगाव जिल्हा दूध संघाची पूर्वी तीन लाख लिटर क्षमतेचे प्रक्रिया केंद्र होते. मात्र आता तब्बल ५ लाख लिटर क्षमतेचे केंद्र सुरू उभारण्यात आले आहे. दूध संघात दुग्धजन्य पदार्थाचे नवीन प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे.

अत्याधुनिक व टोमॅटिक केंद्र आहे. यात खवा आणि पेढा निर्मिती प्रक्रीया केंद्रही उभारण्यात आले आहे. एकीकडे ही जमेची बाजू असतांना पाच लाख लिटर क्षमतेचा संघ पूर्ण क्षमतेने कधीच चालला नाही. मधल्या कळात अतिरिक्त कर्मचार्‍यांची भरती केली गेली. तुपाला पाय फुटले, लोण्याला बोके लागले आणि संघ डबघाईला येवून १७ कोटींच्या तोट्यात गेला. त्यानंतर एनडीडीबीने दूध संघ ताब्यात घेतला. त्यानंतर दूध संघ पून्हा नफ्यात आला. दूध संघाची नाळ ग्रामीण भागाशी थेट जुळली असल्याने यावर ताबा असणार्‍यांना राजकीय लाभ होतो हे सांगायची आवश्यकता नाही. शिवाय याचे अर्थकारणही खूप मोठे असल्याने दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी सर्वांची कसरत सुरु आहे. यंदा या निवडणुकीला खडसे व महाजन यांच्यातील वैय्यक्तीक मतभेदांची किनार असल्याने ही निवडणूक जास्त चर्चेत आली आहे.

जिल्हा दूध संघ निवडणुकीवरील स्थगिती उठविली

राज्य शासनाने मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण सांगून राज्यातील ७ हजार १४७ सहकारी संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची स्थगिती उठवण्यात आली. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप-शिवसेना शिंदे गट अशी सरळ लढत होणार आहे. निवडणुकीत खडसे यांच्या नेतृत्वाखालील गट हा ‘सहकार पॅनल’असून त्यांना विमान चिन्ह, तर मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील गट हा ‘शेतकरी पॅनल’असून त्यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. अपक्ष उमेदवार उषाबाई विश्वास पाटील यांना कपाट चिन्ह देण्यात आले आहे. पाचोरा तालुका मतदार संघातून मंत्री महाजन गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माघार घेतल्याने पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप वाघ यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. दिलीप वाघ बिनविरोध असल्यामुळे दोन्ही गटाच्या पॅनलमध्ये त्यांचे नाव नाही.

तालुकानिहाय असे आहेत मतदार :

जळगाव – २२
धरणगाव – १५
एरंडोल – २१
पारोळा – ३१
अमळनेर – ३६
चोपडा- ४२
यावल – २२
भुसावळ – ११
मुक्ताईनगर – १९
बोदवड – १४
जामनेर – ३५
रावेर – ३८
पाचोरा – ४८
भडगाव – २८
चाळीसगाव – ५९

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.