टॉवर चौकात धारदार शस्त्राने तरुणाला भोसकले

जळगाव लाईव्ह न्यूज | २ एप्रिल २०२३ | जिल्ह्यात खून आणि दंगलींचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टॉवर चौकात जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत हल्ला करण्यात आला आहे. घटनेनंतर लागलीच शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर येथील मूळ रहिवासी असलेल्या विक्की सांडू यादव वय-२५ हा काही दिवसांपासून जळगावात राहत होता. मालवाहू वाहनाने हमाली काम करून तो स्वतःचा उदरनिर्वाह भागवत होता. रविवारी रात्री ९ वाजेच्या जुन्या वादातून टॉवर चौकात दोघांमध्ये वाद झाले. वाद वाढल्याने विक्की यादव याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत विवेक किशोर मराठे याला ताब्यात घेतले. जखमीला अगोदर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.