ऑक्सिजन टॅंक संपला, मात्र हिम्मत कायम : ‘टीमवर्क’मुळे २७० रुग्णांचे वाचवले प्राण
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पटेल यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी १४ मे रोजी पुष्प देऊन सत्कार केला. गुरुवारी १३ मे रोजी रात्री ऑक्सिजन टॅंक संपल्यानंतर उत्तम ‘टीम मॅनेजमेंट’ करीत उपलब्ध ऑक्सिजन बॅकअप प्रणालीद्वारे शिस्तबद्ध व्यवस्थापन करून रुग्णांचा श्वास निरंतर सुरु ठेवल्याबद्दल तसेच, १४ रोजी त्यांचा वाढदिवस असतानाही त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजनचे नियोजन करण्यासाठी ऑक्सिजन समिती गेल्या १५ महिन्यांपासून कार्यरत आहे. या समितीचे कामकाज निरंतरपणे बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल सांभाळत आहेत. त्यांनी यापूर्वी देखील आणीबाणीची परिस्थिती उदभवत असताना यशस्वीपणे ऑक्सिजन सिलेंडरचे नियोजन करून वैद्यकीय सेवेत अविरत सेवा दिली आहे. रुग्णाचा जीव गमवावा लागण्याची शक्यता असल्याने अधिक काळजी घेऊन ऑक्सिजन प्रणालीचे व्यवस्थापन डॉ. पटेल करीत आहे.
गुरुवारी १३ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० किलो लिटरचे ऑक्सिजन टॅंक संध्याकाळी ७. ३० वाजता पूर्णपणे संपले. मात्र हिम्मत न हरता ऑक्सिजन टॅंक संपण्याच्या १० मिनिट आधी डॉ. पटेल यांनी तातडीने १०० ऑक्सिजन सिलेंडरची बॅकअप प्रणाली सुरु केली. ज्यांची ड्युटी संपली आहे, त्या कर्मचाऱ्यांनाही तातडीने बोलावून ‘ऑपरेशन ऑक्सिजन’ सुरु केले. सर्व वॉर्डात जाऊन त्यांनी आढावा घेतला. मक्तेदाराला संपर्क करीत नव्याने १०० सिलेंडर आणखी मागवून घेतले. ऑक्सिजन टँकर मध्यरात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी ऑक्सिजन टँकर आले त्यावेळी त्यांनी टँकर पूर्ण उतरवून घेतला, त्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तब्बल आठ तास ऑक्सिजन समितीची धावपळ सुरु होती. यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद हेदेखील तब्बल ६ तास थांबून डॉ. पटेल यांचे व्यवस्थापन पाहत वेळ पडल्यास त्यांना मार्गदर्शन करीत होते. रात्री १२ वाजेनंतर वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सदिच्छा देण्यासाठी फोन केले. मात्र, ‘महत्वाच्या कामात आहे, नंतर बोलूया’ म्हणत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत ऑक्सिजन प्रणाली सुरळीत करण्यासाठी स्वतः:ला झोकून दिले होते. त्यामुळे एकही रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही.
यावेळी त्यांना ऑक्सिजन समितीचे सदस्य तथा कार्यालय अधीक्षक संजय चौधरी, अनिल पाटील, गजानन चौधरी, नितीन चौधरी, दीपक पवार, भीमराव ढाकणे, किशोर माळी, किशोर सोनवणे, सुभाष असोदेकर, गणेश शिंपी, लोकेश मिस्त्री, उज्ज्वल गोयर, मिलिंद चौधरी, प्रवीण साळुंके, यशवंत राठोड, विनोद राठोड यांचे सहकार्य लाभले. समयसूचकता दाखवत ऑक्सिजन प्रणालीचे कार्य उत्तम पद्धतीने केल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त डॉ. संदीप पटेल यांचा शुकवारी १४ रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पुष्प देत सत्कार केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. सतीश सुरळकर उपस्थित होते.