जळगावचे भरीताचे वांगे आणि भरीत का स्पेशल आहे? वाचा स्पेशल स्टोरी

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ डिसेंबर २०२२ | जळगावच्या खाद्य संस्कृतीत वरणबट्टी आणि भरीत भाकरी यांना विशेष स्थान आहे. जळगाव जिल्ह्यातील भरीताचे वांगे संपूर्ण देशात प्रसिध्द असल्याने भरीताचे वांगे आणि भरीत याचा जळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागतो. जळगाव जिल्ह्यातील भरीताचे वांगे केवळ महाराष्ट्रातच नव्हे दर देशभरात अनेक ठिकाणी पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात थंडी वाढताच भरीताच्या वांग्यांची मागणी देखील वाढली आहे. कारण गुलाबी थंडीची चाहूल लागतात जळगाव जिल्ह्यातील खवय्यांना वेध लागतात ते भरीत पार्ट्यांचे! तुम्हाला माहित आहे का जळगाव जिल्ह्यातील भरीताचे वांगे आणि भरीत का स्पेशल आहे?

जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही प्रसिद्ध आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील वातावरण व जमीन वांग्यांसाठी पोषक असल्याने त्यांची जी विशिष्ट चव आहे, ती इतरत्र कोठेही मिळत नाही. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते व ते येथेच मोठ्या प्रमाणात पिकविले जातात. विशिष्ट चव व गुणधर्मांमुळे जळगावच्या भरीताच्या वांग्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे, जळगाव तालुक्यातील असोदा, भादली, ममुराबाद, इदगाव, कानळदा, रावेर तालुका तसेच वरणगाव, बोदवड तालुक्यांमध्ये भरीताच्या वांग्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये वर्षभर भरीताच्या वांग्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र त्यांची खास चव लागते ती थंडीच्या दिवसांमध्येच!

वांगे भाजल्यानंतर त्यामधून जास्त तेल सुटेल अशा वांग्यांना अधिक मागणी असते. यासाठी बामणोद, आसोदा, भादली या भागातील वांगे प्रसिद्ध आहेत. या भागातील भरीताच्या वांग्यांना विशिष्ट अशी चव तर असतेच शिवाय त्यात बियांचे प्रमाण अत्यंत कमी असते. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यानंतर भरीत पार्ट्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. घरी आलेल्या पाहुणे मंडळींना भरीताचा पाहुणचार केला जातो, कोणताही समारंभ असल्यास त्यात भरीताचा मेनू हमखास असतोच.

जळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणात भरीताचे वांगे आणि भरीत मोठा वाटा उचलते. याचं कारण म्हणजे, खवय्यांसाठी फक्त जळगाव शहरात १००च्या वर भरीत सेंटर्स सुरु झाले आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगवी, येथेही भरीत सेंटर सुरू झाले आहेत. या सोबतच मुंबई, डोंबविली, कल्याण, ठाणे येथेही भरीत सेंटर्सचे बोर्ड पहायला मिळतात. तेथील बाजारपेठेसाठी जळगावयेथून मोठ्या प्रमाणात भरीताचे वांगे पाठविले जातात. जसे चुलीवरचे मटन फेमस आहे तसे जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुलीवर विशेषत: तुरकाठ्यांवर भाजलेल्या वांग्यांना मोठी मागणी दिसून येते.