जळगाव लाईव्ह न्यूज | १९ ऑगस्ट २०२३ | स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank India) घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी जळगावातील आर. एल. समूहाची ईडीकडून (RL Jewelers) करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 87 लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच दागिने सील करण्यात आले. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी ईश्वरलाल जैन त्यांचे पुत्र आणि माजी आमदार मनीष जैन यांना ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावल्याचे कळते. मात्र ईडीची ही कारवाई नियमबाह्य असून याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे माजी खासदार तथा आर. एल. समूहाचे संचालक ईश्वरलाल जैन यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती तथा राज्यसभेचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची जळगावसह राज्यातील विविध ठिकाणी सोने-चांदी विक्रीची फर्म आहे. त्यांचे चिरंजीव व विधान परिषदेवरील माजी आमदार मनीष जैन हे देखील त्याचे संचालक आहेत. विस्तारीत कामांसाठी ईश्वरलाल जैन यांनी स्टेट बँकेकडून विविध ठिकाणच्या मालमत्ता तारणावर स्टेट बँकेकडून 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचा वाद सुरू असल्याने स्टेट बँकेने या प्रश्नी तक्रार दाखल केली आहे.
दाखल तक्रारींच्या चौकशीसाठी गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी सीबीआय चौकशी झाली, तर आता गुरुवारी ईडीने तपासणी केली सलग दोन दिवस ही तपासणी सुरु होती. कागदपत्रांची तपासणी करून नंतर माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार मनीष जैन व त्यांचे दोघे चिरंजीव यांचे जबाब नोंदविले. चौकशीसाठी माजी खासदार ईश्वरलाल जैन व माजी आमदार मनीष जैन यांना चौकशीसाठी ईडीच्या मुख्यालयात हजर रहाण्याची नोटीसही बजावली असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी ईश्वरलाल जैन यांनी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला. आपण फर्मचे मालक नसून आपले दोघा नातवांच्या नावाने ही फर्म असल्याने ईडीची चौकशी योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 525 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाचा वाद न्यायालयात असून आपल्याकडे बेकायदा व्याजाची मागणी केल्याने हा वाद सुरू आहे. तसेच फर्म नातवांच्या नावाने असल्यामुळे त्यांचा या कर्ज प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
ईडीने केलेली ही कारवाई कायद्याला धरुन नाही, त्याविरोधात आपण न्यायालयात लढा देणार आहोत. त्यात आपल्याला यश मिळेल असा विश्वास आहे. मात्र झालेल्या कारवाईमुळे सर्वच सोने, रोकड त्यांनी ताब्यात घेतल्याने आपला व्यावसाय आज अडचणीत आला आहे. आरएल ग्रुपवर झालेली ही कारवाई राजकीय हेतूने झाल्याची चर्चा केली जात असली तरी मला अजून तरी यामध्ये राजकारण आहे किंवा नाही, हे सांगू शकत नाही, असेही ईश्वरलाल जैन म्हणाले.