दिवसा कपड्यांची इस्त्री अन् रात्री घरांवर हात साफ
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । बेरोजगारीने बेजार झालेला तरुण दिवसभर कष्ट करून कपडे इस्त्रीचा व्यवसाय करायचा. व्यवसायाच्या बहाण्याने ग्राहकांच्या घरी कपडे आणणे व पोहचविण्याचा बहाण्याने तो टेहाळणी देखील करीत होता. मौजमजेची सवय लागली आणि त्याने रात्री बंद घरे फोडण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अट्टल चोरट्यास शुक्रवारी अटक केली आहे. कपिल दिलीप वाघ (रा.पेंढारपुरा, पारोळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पारोळा तालुक्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथकाला तपासाच्या सूचना केल्या होत्या. पारोळा पंचायत समितीच्या बाजूला कपडे इस्त्रीचा व्यवसाय करणारा कपिल दिलीप वाघ (रा. पेंढारपुरा, पारोळा) हा घरफोड्या करीत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावरून पोहेकॉ.सुनील दामोदरे, जयंत पाटील, दीपक पाटील, पोना. प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, किरण धनगर, भगवान पाटील, पोकॉ. सचिन महाजन, चालक पोहेकॉ.दीपक चौधरी, पोना. अशोक पाटील आदींच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने दोन घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून १५ हजार रुपये जप्त करण्यात आले.
चोरीच्या पैशांवर करायचा मजा
कपिल हा इस्त्रीसाठी कपडे ने-आण करीत असतांना घरांची पाहणी करून रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी करायचा. व त्या चोरीच्या पैशावरून मौजमजा करीत करीत होता. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.