⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

मनरेगा घोटाळ्याप्रकरणी 501 ग्रामसेवकांची चौकशी सुरु ; शासकीय वर्तुळात मोठी खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२३ । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत (मनरेगा) गावातील बेरोजगारांना रोजगार दिला जातो. मात्र महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मनरेगा (MGNREGA) कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून हे प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. दरम्यान, या प्रकरणी 36 अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून, तब्बल 501 ग्रामसेवकांची सध्या विभागीय चौकशी सुरु आहे. त्यामुळे, शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात 2011 ते 2019 या कालावधीमध्ये मनरेगा कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या कामाच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते.

तर आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नरेगाच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. ज्यात आतापर्यंत या प्रकरणात काय कारवाई झाली याची माहिती देण्यात आली आहे.

बीडच्या जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्ये विविध बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. ज्यात, नरेगा घोटाळ्यातील जनहित याचिका प्रकरणी 2016 ते आतापर्यंत एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई बीड आणि अन्य एका गावातील प्रकरणाचा समावेश आहे. ज्या प्रकरणांमध्ये अपहार झाल्याचे स्पष्ट आहे, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लेखापरीक्षणातील आक्षेपाच्या आधारावर चौकशी सुरु असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत 36 अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये सहा जण निर्दोष आढळले आहेत. तर दोन जणांची वेतन वाढ थांबवण्यात आली आहे. तर, याच प्रकरणात लेखापरीक्षणातील आक्षेपावरुन 501 ग्रामसेवकांची सध्या विभागीय चौकशी सुरु असल्याचं शपथपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.