उद्यापासून जळगावातून आंतररराज्य बस सेवेला सुरुवात
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । टाळेबंदीमुळे गेल्या ३ ते ४ महिन्यापासून बंद असलेली एसटीची आंतरराज्य बस सेवा आता पुन्हा सुरु होणार आहे. उद्या बुधवारपासून जळगाव आगारातून आंतरराज्य वाहतुकीला सुरत बसद्वारे सुरुवात करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यात जिल्हा व आंतरजिल्हा पुन्हा बंद करण्यात आली होती. परंतु राज्यात १ जून पासून अनलॉक सुरू झाल्यानंतर क्रमाक्रमाने जिल्हा व आंतरजिल्हा वाहतुकीला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे क्रमाक्रमाने बसफेऱ्यात वाढ होत ४ फेऱ्यांचे आता तेराशे फेऱ्यांवर बस वाहतूक सुरू झाली आहे.
त्यामुळे १६ जूनपासून सुरत बसद्वारे आंतरराज्य वाहतुकीला सुरुवात होत असल्याची माहिती आगार प्रमुख नीलेश पाटील यांनी दिली. कोरोनाचा सर्वाधिक फटका बस वाहतुकीला बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक महिने बस वाहतुक बंद होती. ती आता रुळावर येऊ लागली आहे.