जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२५ । यावल तालुक्यातील हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आज केली.

भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड यांच्यामार्फत हे अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार असून, महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे केंद्र म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे. या केंद्रामुळे शेतकऱ्यांना रोगमुक्त, उच्च उत्पादनक्षम आणि परवडणाऱ्या दरातील टिशू कल्चर रोपे वेळेत उपलब्ध होणार असून उत्पादनात वाढ होईल.

हिंगोणा (ता. यावल) हे ठिकाण या केंद्रासाठी आदर्श निवडले गेले आहे. खोल काळी सुपीक माती, पुरेशी पाण्याची उपलब्धता तसेच केळी पट्ट्याच्या मध्यभागी असलेला भौगोलिक लाभ यामुळे या ठिकाणी हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. याबद्दल रक्षाताई खडसे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या केंद्राच्या उभारणीमुळे जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातील शेतकरी ‘बनाना कॅपिटल’ म्हणून आपली ओळख अधिक बळकट करतील, असा विश्वास श्री मती खडसे यांनी यावेळी व्यक्त केला.




